क्षत्रिय मराठा समाजात समशेरीचा पराक्रम त्रिलोकविश्रुत आहे. पण समशेरबहाद्दरीच्या जोडीने कलमबहाद्दरी गाजविणारा मराठा बच्चा यशवंतराव शिर्क्याशिवाय दुसरा आढळत नाही. हा ‘शिरकाण’ केलेल्या विख्यात शिर्के घराण्यातला प्रतापसिंहाचा मामेभाऊ. याच्या भाऊबंदकीचे तंटेबखेडे फारच असत. या बखेड्यांच्या पायी एका घराण्याची अनेक घराणी झाली नि ती नेहमी एकमेकाना पाण्यात पहात असत. यशवंतराव फार टापटिपीचा, सरळ पण संशयखोर मनाचा गृहस्थ दिसतो. याने लिहून ठेवलेली स्मरण वही अनेक दृष्टींनी फार महत्त्वाची आहे. त्याचे मोडी अक्षर वळमदार नि प्रेक्षणीय आहे. लिहिण्याची सफाई,शोध घालण्याची पद्धती नि बारीकसारीक मजकूर मनमोकळ्या दिलाने तपशीलवार लिहून ठेवण्याची दक्षता वाखाणण्यासारखी आहे. शिर्क्याने आपल्या स्मरण वहीत भाऊबंदकीची अनेक त्रांगडी, त्यांचा पूर्वापार संबंध, नि त्यांचे परिणाम मुद्देसूद तारीख मितीवार लिहून ठेवले आहेत. या भाऊबंदकीची रडकथा लिहीत असतानाच, छत्रपति प्रतापसिंहाने त्याला विलायतेला जाण्याला सांगितले. अर्थात भाऊबंदकीचे पुराण तसेच राहून, पुढे विलायत-पुराण सुरू झाले. हे सुद्धा यशवंतरावाने मोठे मार्मिक नि शोधक दृष्टीने लिहून ठेवले आहे. त्यावर त्याची टापटीप मते नि स्वभाव चांगली समजतात.
शिर्क्याची भाऊबंदकी म्हणजे एक मोठे भयकंर प्रकरणच. त्यात फसवाफसवी, ठोकाठोकी, मारामारी, जाळपोळ, लूटमार, खून नि रक्तपात या सगळ्यांचा भरपूर समावेश झालेला दिसतो. याचा परिणाम यशवंतरावाच्या स्वभावावर विपरीत होऊन, तो जात्या धाडसी नि उमदा असूनही, अत्यंत चिडचिड्या, संशयी आणि कोणावर सहसा विश्वास ठेविनासा झाला. जिकडे तिकडे त्याला विश्वासघात दिसायचा. त्यामुळे त्याच्याबरोबर काम करणा-या अनेक लोकांवर संशयीपणाने त्याने अनेक आरोप केले. प्रत्येक गोष्ट मी स्वतः करीन, तो अमका तमका माणूस काम करीलच कशावरून? अमकी रकम त्याला तुम्ही दिली का स्वतःच हबकली? पावती का नाही? एकादे सरकारी काम मुकाट्याने करून घेण्यासाठी दिलेल्या ‘चायपान्या’चीही पावती त्याला लागे. रंगो बापूजीने मुंबईस काही आरब मित्रांचा स्नेह जोडला होता आणि नित्य सहवासाने तो त्यांच्याशी आरबी भाषेतही बोलत असे. यशवंतरावच्या समक्ष असे आरबी भाषण झाले का ‘रंगो बापूजीने या परक्या आरबाना माझ्याविषयी काय सांगितले कोण जाणे?’ अशा संशयाने तो व्यग्र व्हायचा. यामुळे विलायतेला जाण्यासाठी छत्रपतीनी त्याची जून १८३६ मध्य रवानगी केली, तरी १९ मार्च १८३९पर्यंत त्याचा पाय मुंबईहून निघाला नाही. या मुदतीतसुद्धा त्याच्या भाऊबंदकीची लफडी अखंड चालूच होती आणि तो अनेक वेळी घरी सिंदला जायचा. तेथून साता-याला यायचा नि मुहूर्त पाहून मुंबईला जायचा. याविषयी यशवंतरावच स्मरणवहीत काय लिहितो, ते वाचणे मनोरंजक आहे.
‘‘नंतर सरकारानी सांगितले की तुमची व आणखी मंडळीची नेमणूक विलायतेस जाण्याची केली आहे. तर तुम्ही येथून निघोन मुंबईस कागपत्रसुधा घेऊन जावे आणि तेथे मीर आफजल आली मुसलमान विलायतेस जावून आलाला माहीतगार आहे. त्याची भेट घेऊन तुमचे त्याचे विच्यारे पुढे विलायतेस जाण्याचा बेत ठरवावा. म्हणोन उभयता बंधू सरकारानी सर्वत्र मंडळी जवल असता आज्ञा केली. व विलायेस पाठवावयाचे काय कारण, ते कागदपत्र तयार जाहले होते, ते दाखविले आणि जेष्टमासी व।। १३ सके १७५८ व सन १८३६ जून* सुक्रवार रोजी मुहूर्त पाहून निघते समई जी मंडळी निघणार ती रंगो बापूजी व हणमंतराव दलवी कोकणात विन्हेर येथे राहाणार याच्या आमच्या समंक्षता केल्या. व उभेयता बंधूसरकार श्री देवीसरकार येथे उभे राहून त्या कागदाचा रुमाल श्रीचे पुढे ठेविला आणि आम्हास उचलावयास सांगितला की कोणतीही प्रर्तणा (प्रतारणा) करू नये. श्रीस स्मरोन वागावे. म्हणो शफती घेतल्यादाखल केले. नंतर विडे सरकारानी उभयतानी देऊन ते कागदपत्र व खर्चाससुधा मुंबईकडे रवानगी केली. व वस्त्रेही आधले रोजीच दिल्ही होती. विलायतेस बोलणार पाठवावयाचे कारण की पेशजीचे तहनाम्याचे वहिवाटीस फरक इंग्रजी सरकारचे कामगारांनी आणिला स।। त्याचा बंदोबस्त विलायतेहून करावयाचा म्हणोन.’’
यशवंतराव मुंबईला आल्यावर जहाज मिळण्याची वगैरे व्यवस्था लवकर लागे ना. मुंबईहून वाफेची पहिली आगबोट २० मार्च १८३० रोजी सुएजकडे जाण्याचा समारंभ झाला होता. त्यात फक्त व्यापारी माल नि सरकारी टपाल पाठविले होते. आगीने पाण्याची वाफ करून त्यावर गलबते चालविण्याच्या गो-या लोकांच्या भुताटकीवर हिंदी प्रवाशांचा विश्वास नसे. शिवाय आताच्या पी. अँड ओ. कंपनीसारखी संस्था त्यावेळी नव्हती. कोणातरी व्यापा-याच्या मेहेरबानीने भरंसाट पैसे देऊन प्रवासापुरते जहाज किंवा जहाजातली थोडीशी जागा भाड्याने विकत घ्यावी लागत असे. जहाजासाठी बरोबरची मंडळी ज्या खटपटी करीत, त्यावर यशवंतरावचा विश्वास बसायचा नाही. कोठे थोडी चिरमिरी दिली, का हा एकदम उस्तळायचा नि म्हणायचा ही पैशाची उधळपट्टी. सगळ्या गोष्टी सरळ नि सहज घडून याव्या, त्यात आत बाहेर उघड गुप्त काही नसावे ही त्याची मनाची ठेवण. परिस्थितीप्रमाणे आचारविचारांत बदल करायची वृत्तीच नाही. त्यामुळे रंगो बापूजी, भगवंतराव विठ्ठल चिटणीस आणि हणमंतराव दळवी वगैरे मंडळी कंटाळून गेली. प्रत्येक वेळेला संशय नि बेविश्वास. ‘मला तुझ्याबरोबर विलायतेला येण्याचे जमणार नाही, जा जाऊन सांग महाराजांना.’ असे म्हणून हणमंतराव आपल्या गावी परत गेला.
शिवाय, यशवंतरावाची भाऊबंदकी कोठे स्वस्थ बसली होती? मुंबईलाही ती त्याचा पिच्छा पुरवीतच होती. म्हणून तो विलायतेचा बेत रद्द करून अनेक वेळा मुंबईहून सिंदाला, सिंदाहून साता-याला, तेथून पुन्हा मुहूर्त पाहून मुंबईला, अशा सारख्या येरझारा घधालीत होता. इकडे पहावे तो नातूप्रकरणाला चांगला कढ येऊन ते अनेक बटाट्यांना शिजवू लागले. पहिल्या धडाक्याला ‘गोविंदराव फडणीस दिवाम याजवर रसिदंटानी फितुराचे तुफान विलायतेस जाणारे निघाले सबब उभे करून शके १७५८ भाद्रपत व।। १२ रोजी बोलावून नेऊन कापात कैद करून ठेविले.’ सर्वत्र आणखीही धरपकड सुरू झाल्यामुळे छत्रपतींनी ‘तुम्ही पुणीयास जाऊन तेथे स्वस्त राहावे’ असे यशवंतरावास सांगितले ‘म्हणोन सातारियाहून फालगुण मासी शके १७५८ या साली निघोन पुणीयात येऊन च्यार पांच महिने राहिलो. त्यावर महाराजाकडून बोलावणे आले की जलद सातारियास येणे. त्यावरून निघोन आशाढ व।। ११ शके १७५९ या रोजी (२८ जुलै १८३७) सातारियास पोहचलो. सातारियास पोहचताच माहाराज सरकारची भेट घेतली. तेव्हा सरकार बोलले की आमचे दुस्मानदार लोकांनी आमची व कुंपणी सरकारची तेड हाकनाहक दिवसेंदिवस फार वाढविली. त्याविसि डाकटर मिलन बोलण्याच घातला. परंतु त्याच्याने काही होत नाही व दुसरीही पुस्कल मेहनत त्याची आमची सफाई होण्याविसी करीत आहो. परंतु इंग्रजी सरकारातून गोविंदराव धरल्यापासून आमचेकडील यादीपत्राचा जबाब काहीच येत नाही. तेणेकरून पुढे कोणते वेलेस काय होईलयाचा नेम लागत नाही. यास्तव.... तुम्ही विलायतेस निघोन जाण्याचे केल्यास आम्हास पुढील कामाचा भरवसा वाटेल.’
पुन्हा आणाशपथा, प्रतिज्ञा, सुमुहूर्त वगैरे होऊन शिर्के मुंबईला आला. रंगो बापूजी नि भगवंतराव विठ्ठल यांनी खटपटी करून ‘उलमार’ De Ulma नावाच्या एका फ्रेंच कप्तानाला मथवून त्याचे ‘जॉर्ज कुबेर’ नावाचे जहाज शिर्के भगवंतरावच्या लंडन-प्रवासासाठी ठरवून ठेवले. यशवंतराव लिहितो - ‘त्याची तारीख माघ अखेरीस फेब्रुवारी महिन्यात निघावयाची होती. ती आम्हास उलमार याणे सांगितले. तेव्हा इकडे आमचाही सरंजाम वगे तयारी बहुतेक आटपली होती व दुभाशी जवळ पाहिजे म्हणोन पेशजी महाराजांनी नरसिंराव मुनसी पाठविला होता तो चोंगला नहुता. म्हणोन व त्याचे गुण नीट नसोन त्याचे मनात जावयाचे नहुते. सबब परत गेला होता. त्या बद्दल फिरंगी करस्ताव पेट्रो लोरेस देमोत यास दरमहा करून ठेविला.’
संदर्भ - माननीय प्रबोधनकार ठाकरे यांच्या लेखसंग्रहातून संकलित